नवी दिल्ली, 19 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे देखील उपस्थित होते. या नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. दरम्यान, त्यांच्या या भेटीचे फोटो अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर शेयर केले आहेत. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मलाही या ग्रेट-भेटीचा साक्षीदार होता आलं!” असे अमित ठाकरे या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. अमित ठाकरेंची पोस्ट
युती होणार का?
सध्याच्या राजकीय घडामोडींवरून आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-मनसे यांच्यात युती होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या आजच्या भेटीमुळे मनसे आणि भाजप हे पक्ष युतीसाठी सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे-भाजप यांच्यात युती झाल्यास मनसेला किती जागा मिळणार? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या आजच्या भेटीनंतर मनसेचा महायुतीत सहभाग होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे मात्र महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मनसेचा महायुतीत प्रवेश झाल्यास त्याचा परिणाम शिवसेनेच्या शिंदे गटाच्या जागांवर होऊ शकतो, असेही म्हटले जात आहे.
आजवर कधीही युती केलेली नाही
तत्पूर्वी, शिवसेना पक्ष सोडल्यानंतर राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्यानंतर 2009 च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने 13 जागा जिंकल्या होत्या. मात्र, अलीकडच्या काळात मनसेला फारसे यश मिळालेले नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना फक्त एकच जागा जिंकता आली. तरी देखील मनसेने आपल्या पक्ष स्थापनेपासून कोणत्याही पक्षासोबत युती केलेली नव्हती. राज ठाकरे यांनी आजवर कायम एकटे लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता मनसे आणि भाजप यांच्या युतीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दोन्ही पक्षांची युती झाल्यास मनसेसाठी ही राजकारणाची नवी दिशा ठरणार आहे.