मुंबई, 14 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी महिलांचा अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना प्रति अर्ज 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. दरम्यान, ही योजना सुरू होऊन आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात आतापर्यंत 12 हजार रुपये जमा झाले आहेत. तरी देखील या योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांना ठरल्याप्रमाणे सरकारकडून पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांना हे पैसे कधी मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला होता.
https://x.com/RRPSpeaks/status/1899723808875196676?t=BZN6Hg1JSdbHanVqPJFZqA&s=19
रोहित पवार आणि वरूण देसाई यांच्याकडून प्रश्न उपस्थित
यासंदर्भात विधानसभा आमदार रोहित पवार आणि वरूण देसाई यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. सेविका आणि पर्यवेक्षिका यांना लाडकी बहीण योजनेचा प्रोत्साहन भत्ता कधी पर्यंत मिळणार? असा सवाल त्यांनी या अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना, या योजनेसाठी अंगणवाडी सेविकांनी पात्र उमेदवारांचे अर्ज भरले होते. त्यांना लवकरच प्रोत्साहन भत्ता मिळेल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
31.33 कोटी रुपये निधी वितरित
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी लाभार्थी महिलांचा अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना सरकारकडून प्रति अर्ज 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आवश्यक असलेला 31.33 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून, या भत्त्याचे वितरण क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे. त्यामुळे लवकरच त्यांना हे पैसे मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली.
लाभार्थी महिलांच्या संख्येत मोठी वाढ
दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या संख्येत जवळपास 14 लाखांची वाढ झाल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी, म्हणजेच ऑक्टोबर 2024 मध्ये या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सुमारे 2 कोटी 33 लाख 64 हजार इतकी होती. विधानसभा निवडणुकीनंतर, म्हणजेच फेब्रुवारी 2025 मध्ये या लाभार्थ्यांची संख्या सुमारे 2 कोटी 47 लाख झाली आहे. म्हणजेच लाभार्थ्यांच्या संख्येत निवडणुकीनंतर जवळपास 14 लाखांची वाढ झाली आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.