मुंबई, 7 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा 3 गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 गडी गमावून 291 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 46.5 षटकांत 293 धावा करून हा सामना 3 गडी राखून जिंकला. या विजयामुळे ऑस्ट्रेलिया संघाने आता विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्याचा ग्लेन मॅक्सवेल हा हिरो ठरला. मॅक्सवेलने या सामन्यात नाबाद 201 धावांची खेळी करून ऑस्ट्रेलिया संघाला एकहाती विजय मिळवून दिला. या कामगिरीमुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला आहे. तर या विश्वचषकातील हे पहिलेच द्विशतक आहे.
https://twitter.com/ICC/status/1721933766090699214?s=19
तत्पूर्वी या सामन्यात 291 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाची खराब सुरूवात झाली. त्यांचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड खाते न खोलताच बाद झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या लागोपाठ विकेट पडत गेल्या. यावेळी मिचेल मार्श (24), डेव्हिड वॉर्नर (18), मार्नस लॅबुशेन (14), जोश इंग्लिस (0), मार्कस स्टॉयनिस (6) आणि मिचेल स्टार्क (3) हे फलंदाज लवकर बाद झाले. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघाची 18.3 षटकांत 7 बाद 91 धावसंख्या होती. तेंव्हा हा सामना अफगाणिस्तान सहजपणे जिंकेल, असे वाटत होते. मात्र त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार पॅट कमिन्स या दोघांनी नाबाद 202 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलिया संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने 128 चेंडूत नाबाद 201 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने 21 चौकार आणि 10 षटकार लगावले. त्याला कर्णधार पॅट कमिन्सने चांगली साथ दिली. पॅट कमिन्सने या सामन्यात अत्यंत सावधगिरीने फलंदाजी करून एका बाजूची विकेट टिकून ठेवली. त्याने या सामन्यात 68 चेंडूत नाबाद 12 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर या सामन्यात अफगाणिस्तानतर्फे नवीन उल हक, अजमतुल्ला उमरझाई आणि रशीद खान यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
तर याच्या आधी अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 291 धावा केल्या. यामध्ये अफगाणिस्तानकडून इब्राहिम झद्रानने सर्वाधिक 143 चेंडूत नाबाद 129 धावांची खेळी केली. त्यामूळे विश्वचषकात अफगाणिस्तानसाठी शतक झळकावणारा इब्राहिम झद्रान हा पहिला खेळाडू ठरला. तर राशिद खाने डावाच्या शेवटी 18 चेंडूत 35 धावा केल्या. तर गोलंदाजीत ऑस्ट्रेलिया तर्फे जोश हेझलवूडने 2 विकेट घेतल्या. तर मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि ॲडम झम्पा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
One Comment on “मॅक्सवेलचे द्विशतक! ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत”