केरळमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन; 24 जण ठार, 70 जखमी

वायनाड, 30 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) केरळमधील वायनाड जिल्ह्यातील डोंगराळ भागात आज (30 जुलै) सकाळी मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 70 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, भूस्खलनामुळे या ढिगाऱ्यांखाली शेकडो लोक दबले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनाच्या घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले आहे. यावेळी सर्व प्रशासकीय यंत्रणा बचाव कार्यात सहभागी झाल्या आहेत.

https://x.com/AHindinews/status/1818149341510668692?s=19

https://x.com/AHindinews/status/1818117909631406131?s=19

बचावकार्य सुरू

दरम्यान, केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी या दुर्घटनांमध्ये 24 जणांचा मृत्यू आणि 70 हून अधिक लोक जखमी झाल्याची पुष्टी केली आहे. वायनाड चुरलमला येथील बचाव कार्यात अग्निशमन आणि बचाव, नागरी संरक्षण, एनडीआरएफ आणि स्थानिक आपत्कालीन प्रतिसाद दलाचे 250 जवान सहभागी झाले आहेत. तसेच एनडीआरएफच्या अतिरिक्त पथकाला तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

https://x.com/AHindinews/status/1818112527894491386?s=19

आरोग्य विभागाकडून हेल्पलाईन नंबर जारी

वायनाड येथील भूस्खलनाच्या घटना लक्षात घेता आरोग्य विभागाने जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष उघडले आहे. तसेच त्यांनी आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी 8086010833 आणि 9656938689 हे दोन हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने येथील वैथिरी, कालापट्टा, मेप्पडी आणि मानंतवाडी रुग्णालयांसह सर्व रुग्णालये सज्ज ठेवली आहेत. याशिवाय वायनाडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची आणखी पथके तैनात करण्यात येणार आहेत.

https://x.com/PMOIndia/status/1818125253928759430?s=19

पंतप्रधानांकडून आर्थिक मदत जाहीर

या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायनाडमधील भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भूस्खलनाच्या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली आहे. “वायनाडच्या काही भागांना भूस्खलनाचा तडाखा बसल्याने दुःख झाले आहे. माझे विचार त्या सर्वांसोबत आहेत ज्यांनी प्रियजन गमावले आहेत आणि मी जखमींसाठी प्रार्थना करतो. सर्व बाधित लोकांना मदत करण्यासाठी सध्या बचावकार्य सुरू आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी मी बोललो आणि तेथील सद्यस्थिती पाहता केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *