बनासकांठा, 02 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील डीसा येथील धुनवा रोड येथील फटाक्याच्या फॅक्टरीत मोठा स्फोट झाला. या आगीत कारखान्यात काम करणाऱ्या 18 कामगारांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी (दि.01) घडली. या मृत कामगारांची सध्या ओळख पटली आहे. मृतांपैकी बहुतेक जण मध्य प्रदेशातील देवास आणि हरदा जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने बचाव कार्य राबवत मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यास सुरूवात केली.
https://x.com/AHindinews/status/1907289775465255090?t=Eeoksmvx27aREvAGA74gPA&s=19
पोलीस अधिकाऱ्यांनी दिली माहिती
बनासकांठा जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुबोध मानकर यांनी या दुर्घटनेबाबत बुधवारी (दि.02) अधिक माहिती दिली. “या घटनेची कायदेशीर चौकशी कालच पूर्ण करण्यात आली होती. मात्र, मृतांचे कुटुंबीय येईपर्यंत प्रतिक्षा करण्यात आली. गुजरात आणि मध्य प्रदेश प्रशासनाच्या समन्वयाने मृतदेह गावी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.” असे त्यांनी सांगितले. दरम्यान, मध्य प्रदेशच्या देवाससाठी विशेष पथक पाठवण्यात आले आहे. तसेच, मध्य प्रदेशच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुजरात प्रशासनाशी समन्वय साधून मृतदेह वाहतुकीची व्यवस्था केली आहे.
4 जण ताब्यात
या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपास सुरू असून, अधिक पुरावे हाती लागल्यास पुढील कारवाई केली जाईल. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही आग कशामुळे लागली? याचा शोध प्रशासन घेत आहे. दरम्यान ही दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाने मदत कार्य तातडीने सुरू केले असून, मृतांच्या कुटुंबीयांना आवश्यक मदत पुरवली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
https://x.com/PMOIndia/status/1907066796458266734?t=iyFZ-dh5B7A-pyAOTy5l5g&s=19
https://x.com/AHindinews/status/1907108255605645617?t=5a_SIdd2PbDg0HPdnQPzAQ&s=19
सरकारकडून आर्थिक मदत
दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी गुजरातच्या बनासकांठा येथील फटाक्याच्या फॅक्टरी दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच केंद्र सरकारने देखील या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल, असे ट्विट पंतप्रधान कार्यालयाने केले आहे.