बीड, 01 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्र राज्य सरकारने विशेष तपास पथक स्थापन केले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आयपीएस अधिकारी बसवराज तेली, पोलीस उपमहानिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा आणि पुणे सीआयडी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या विशेष तपास पथकात पोलीस विभागाने नऊ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त केले गेले आहेत, याची माहिती राज्य सरकारच्या जीआर मधून देण्यात आली आली आहे.
https://x.com/PTI_News/status/1874433794213855610?t=HZf90WnXXGxgdPkXdR57Pw&s=19
SIT पथकात या अधिकाऱ्यांचा समावेश
या विशेष तपास पथकात पोलीस उप अधीक्षक अनिल गुजर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंग शिवलाल जोनवाल, पोलीस उप निरीक्षक महेश विघ्ने, पोलीस उप निरीक्षक आनंद शंकर शिंदे, पोलीस उप निरीक्षक तुळशीराम जगताप, पोलीस हवालदार मनोज राजेंद्र वाघ, पोलीस नाईक चंद्रकांत एस. काळकुटे, पोलीस नाईक बाळासाहेब देविदास अहंकारे, पोलीस शिपाई संतोष भगवानराव गित्ते या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे पथक आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
या कलमांखाली गुन्हा दाखल
दरम्यान, बीडच्या केज पोलीस ठाण्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 140(1), 126(2), 118(1), 324(4)(5), 181(2), 191(2), 190 आणि 103(1) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कलमांमध्ये हत्येसंबंधीच्या विविध गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे, ज्यामुळे आरोपींविरोधात कडक कारवाई होऊ शकते.
वाल्मिक कराडला 14 दिवसांची कोठडी
संतोष देशमुख हत्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना जणांना अटक केली आहे. यामध्ये वाल्मिक कराडचा देखील समावेश आहे. दरम्यान वाल्मिक कराडने कालच पुणे सीआयडी मुख्यालयात जाऊन आत्मसमर्पण केले होते. वाल्मिक कराड या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आत्मसमर्पणानंतर त्याची सीआयडीने सविस्तर चौकशी केली. तर या प्रकरणात कोर्टाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. तर संतोष देशमुख प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. यासाठी पोलिसांची विविध पथके तैनात करण्यात आली आहेत.