जळगाव, 28 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय लष्करातील जळगाव जिल्ह्यातील सुपुत्र जवान अर्जुन बावस्कर यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. 24 मार्च रोजी अरूणाचल प्रदेशातील डोपावा येथे कर्तव्य बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. यामध्ये दुर्दैवाने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अचानक निधनाने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
https://x.com/InfoJalgaon/status/1905299843125563454?t=3ihxZVtORpDFnK8cddBAvw&s=19
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
दरम्यान, शहीद जवान अर्जुन बावस्कर यांच्या पार्थिवावर जळगाव जिल्ह्यातील वरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यावेळी त्यांना लष्करी सन्मानासह अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या अंत्ययात्रेत हजारो नागरिकांनी सहभागी होत त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी “अर्जुन बावस्कर अमर रहे” च्या घोषणा उपस्थितांनी दिल्या.
मंत्र्यांकडून कुटुंबीयांचे सांत्वन
त्यांच्या अंतिम संस्कारावेळी मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, लष्करी अधिकारी, पोलीस दलाचे जवान, स्थानिक नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन सांत्वन केले. “देशाने एक शूर जवान गमावला आहे,” अशा भावना याप्रसंगी अनेकांनी व्यक्त केल्या.
15 वर्षांची शौर्यगाथा
अर्जुन बावस्कर यांनी गेल्या 15 वर्षांपासून भारतीय लष्करात सेवा बजावत देशासाठी योगदान दिले. ते जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील रहिवाशी होते. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांचे कुटुंबीय, मित्रमंडळी आणि संपूर्ण जळगाव जिल्हा शोकसागरात बुडाला आहे. शहीद जवान अर्जुन बावस्कर यांच्या अतुलनीय योगदानाला संपूर्ण देश सलाम करत आहे. त्यांची देशसेवा आणि त्याग सदैव स्मरणात राहील. जय हिंद!