बीड, 30 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात गेल्या दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी विविध प्रकारचे आंदोलने केली जात आहेत. आता या आंदोलनांना आज हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले आहे. यामध्ये मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील निवासस्थानावर आज (दि.30) दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. यासोबतच त्यांनी प्रकाश सोळंके यांच्या गाड्यांची तोडफोड करून या गाड्यांना आग लावली. त्यामुळे त्यांच्या बंगल्यातून धुराचे लोट पाहायला मिळत होते. काही वेळातच आग घरभर पसरली होती.
#WATCH | Beed, Maharashtra: Maratha reservation agitators vandalised and set the residence of NCP MLA Prakash Solanke on fire. pic.twitter.com/8uAfmGbNCI
— ANI (@ANI) October 30, 2023
मराठा समाज आणि जरांगे पाटलांनी आम्हाला आणखी वेळ द्यावा- मुख्यमंत्री
या जाळपोळीच्या घटनेनंतर आमदार प्रकाश सोळंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हल्ला झाला तेव्हा मी घरात होतो. सुदैवाने माझ्या कुटुंबातील कोणीही सदस्य किंवा कर्मचारी जखमी झाले नाहीत. आम्ही सर्व सुरक्षित आहोत पण आगीमुळे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. मी मराठा समाजाचाच आमदार आहे. माझा देखील मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. मराठा आरक्षण मिळावे याची मी देखील मागणी करीत आहे. काहीजण अर्धवट क्लिप काढून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज झालेल्या या घटनेबद्दल आपला कुणावरही राग नाही.” असे प्रकाश सोळंके यावेळी म्हणाले. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर
सध्या प्रकाश सोळंके यांच्या घरावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तत्पूर्वी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला शांततेचे आवाहन केले आहे. मराठा समाजाने शांततेत आंदोलने करावीत, कोणत्याही जाळपोळ करु नये. तसेच सर्वांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काळजी घेतली पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
One Comment on “मराठा आरक्षणः आमदाराच्या घरावर दगडफेक, गाड्या जाळल्या (व्हिडिओ)”