नागपूर, 18 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण लागू करावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी दिलेली ही मुदत आता संपत चालली आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नागपूर येथे मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. ही बैठक आज सायंकाळी आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे.
https://x.com/ANI/status/1736597880008474891?s=20
दरम्यान, राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे हे ऑक्टोंबर महिन्यात उपोषणाला बसले होते. त्यानंतर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण मागे घेतले होते. त्यावेळी जरांगे पाटलांनी त्यांचे उपोषण मागे घेताना राज्य सरकारला मराठा आरक्षण लागू करण्यासाठी 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर जरांगे पाटील हे गेल्या महिन्यापासून राज्यभरात सभा घेऊन मराठा समाजातील लोकांशी संपर्क साधत आहेत.
मनोज जरांगे पाटील यांना राज्य सरकारने दिलेली 24 डिसेंबरपर्यंतची मुदत आता संपत आली आहे. राज्य सरकारने 24 डिसेंबरपूर्वी मराठा आरक्षण लागू केले नाही, तर पुढील आंदोलनाची दिशा 23 डिसेंबर रोजी ठरविण्यात येईल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर, नागपूर येथे आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणावरील मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षण संदर्भात कार्यवाही करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत राज्य सरकार कोणता निर्णय घेणार? याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.