मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला 2 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ; मागासवर्ग आयोगाचा निर्णय

मुंबई, 31 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सध्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाला 2 फेब्रुवारीपर्यत मुदतवाढ देण्याचा निर्णय मागासवर्ग आयोगाने घेतला आहे. या संदर्भातील प्रसिद्धी पत्रक मागासवर्ग आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. यापूर्वी या सर्वेक्षणासाठी 31 जानेवारीपर्यत मुदत देण्यात आली होती.

सर्वेक्षणासाठी आणखी वेळ लागणार

या सर्वेक्षणास आणखी वेळ लागण्याची आवश्यकता असल्याने ह्या सर्वेक्षणासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधी दरम्यान नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी घरोघरी जाऊन केवळ मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची घेत आहेत. या सर्वेक्षणासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आयोगामार्फत ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. तसेच सर्वेक्षणासाठी खास अत्याधुनिक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे.

नागरिकांनी सर्वेक्षणास सहकार्य करावे

कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याची माहिती कर्मचाऱ्याला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेतली जाणार नाही. सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने हे नियुक्त अधिकारी किंवा कर्मचारी सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरा सर्वेक्षणासाठी येऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी त्यांना आवश्यक माहिती देऊन सर्वेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन आयोगामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *