जालना, 24 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) मनोज जरांगे पाटील यांनी आज जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला हजर राहण्यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मराठा समाजाचे लोक आंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मराठा समाजाकडून या बैठकीत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंतरवाली सराटी येथील मराठा समाजाच्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी उपोषण केले होते. तरी देखील राज्य सरकारने सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांच्या विरोधात भूमिका घेण्याची तयारी मराठा समाजाने केली आहे. तसेच लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील प्रत्येक गावातून मराठा समाजाच्या वतीने दोन उमेदवार उभे केले जाण्याची चर्चा काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, मराठा समाजाच्या आजच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या बैठकीत मराठा समाजाकडून कोणती मोठी घोषणा केली जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तत्पूर्वी आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव आपल्या वाहनांतून आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे आंतरवाली सराटी गावात मोठ्या प्रमाणात गाड्या पार्क केल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, आंतरवाली सराटीत सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. तसेच याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.