पुणे, 24 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास 22 ऑक्टोंबरपासून सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचे नेते आज (दि.24) त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यामध्ये अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. आदित्य ठाकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांसारखे नेते विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
https://x.com/ANI/status/1849365545466159462?t=7Wn75m5ArfTatKCTa12ryg&s=19
प्रमुख नेते उमेदवारी अर्ज दाखल करणार
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे आज त्यांचा उमेदवारी अर्ज वरळी मतदारसंघातून दाखल करणार आहेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे आज बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघातून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नाशिकच्या येवला मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर कळवा-मुंब्रा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून जितेंद्र आव्हाड आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील हे नेते अर्ज भरणार
त्याचवेळी पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते चंद्रकांत पाटील हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षवर्धन पाटील यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पुणे जिल्ह्यातील भोर मतदारसंघातून काँग्रेसचे संग्राम थोपटे हे आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुनील शेळके आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अशोक पवार हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
राजकीय पक्षांची जोरदार तयारी
दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 29 ऑक्टोंबरपर्यंत मुदत आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासह सर्वच पक्षांच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच ठरण्याची आहे. महविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष प्रत्येकी 85 जागांवर लढणार असल्याचे संजय राऊत यांनी कालच सांगितले आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीसाठी महायुतीतील भाजपने आतापर्यंत 99, शिवसेना 45 आणि राष्ट्रवादीने 38 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यांचे उर्वरित उमेदवार येत्या काही दिवसांत ठरण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाने देखील त्यांचे काही उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.