नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

नागपूर, 19 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण 5 जागांसाठी आज मतदान होत आहे. यामध्ये रामटेक, नागपूर, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर या मतदार संघांचा समावेश आहे. दरम्यान, नागपूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी आज केले आहे. नितीन गडकरी यांनी आज सकाळी नागपुरातील टाऊन हॉल येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. “आज आपण लोकशाहीचा सण साजरा करत आहोत. प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, हा आपला मुलभूत अधिकार तसेच कर्तव्य आहे. तुम्ही कोणालाही मत देऊ शकता पण मतदान करणे महत्त्वाचे आहे. मला 101% विश्वास आहे की, मी चांगल्या फरकाने जिंकेन,” असे नितीन गडकरी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नागपूर येथील धरमपेठ परिसरातील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन मतदान करण्याचे आवाहन केले. “लोकशाहीचा सण सुरू झाला आहे. मी सर्व जनतेला मतदान करून लोकशाही मजबूत करण्याचे आवाहन करतो आणि लोकशाहीच्या या उत्सवात आपला सहभाग नोंदवावा,” असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

या नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी देखील गोंदिया येथील मतदार केंद्रावर सहकुटुंब जाऊन मतदानाचा हक्क बजावला. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज त्यांच्या राहत्या गावी सुकळी येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नामदेव किरसान यांनी आज गोंदिया जिल्ह्यात मतदानाचा हक्क बजावला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर जिल्ह्यातील कोराडी ग्रामपंचायत येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच नागपूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी आज सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला. रामटेक मतदार संघातील महायुतीचे उमेदवार राजु पारवे यांनी आज सकाळी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज सकाळी नागपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला.

हे उमेदवार आमने-सामने!

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील नागपूर मतदार संघातून भाजप उमेदवार नितीन गडकरी आणि काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्यात लढत होत आहे. चंद्रपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात लढत होत आहे. रामटेक मतदार संघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे विरुद्ध काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांच्यात सामना रंगणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात भाजपचे सुनील मेंढे आणि काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांच्यात लढत आहे. तर गडचिरोली- चिमूर मतदार संघात काँग्रेसचे नामदेव किरसान विरुद्ध भाजपचे अशोक नेते अशी लढत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *