दिल्ली, 20 मे: (विश्वजीत खाटमोडे) देशात आज लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. पाचवा टप्प्यात देशातील 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 49 जागांवर आजच्या दिवशी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँगेस नेते राहुल गांधी, भाजप नेते अमित शाह, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, यांसारख्या अनेक नेत्यांनी ट्विट करून देशवासीयांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1792358191633735993?s=19
नरेंद्र मोदींनी काय म्हटले?
पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून मतदारांना विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 2024 लोकसभा निवडणुकीच्या 5 व्या टप्प्यात आज 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 49 जागांसाठी मतदान होत आहे, ज्या जागांसाठी आज मतदान होत आहे त्यासाठी सर्वांना विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेषत: महिला मतदारांना आणि तरुण मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे मी आवाहन करतो, असे पंतप्रधान मोदी या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
https://twitter.com/RahulGandhi/status/1792393845411656062?s=19
राहुल गांधींचे ट्विट
पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. आज मतदानाचा पाचवा टप्पा! संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी जनता उभी राहिली असून भाजपचा पराभव करत असल्याचे पहिल्या चार टप्प्यातच स्पष्ट झाले आहे. द्वेषाच्या राजकारणाला कंटाळलेला हा देश आता आपल्याच मुद्द्यांवर मतदान करत आहे. नोकऱ्यांसाठी तरुण, एमएसपी आणि कर्जमुक्तीसाठी शेतकरी, आर्थिक अवलंबित्व आणि सुरक्षिततेसाठी महिला आणि रास्त वेतनासाठी मजूर. जनता स्वतः ही निवडणूक इंडियासोबत लढत आहे आणि संपूर्ण देशात परिवर्तनाचे वादळ वाहू लागले आहे. मी अमेठी आणि रायबरेलीसह संपूर्ण देशाला आवाहन करत आहे – बाहेर या आणि तुमच्या कुटुंबांच्या समृद्धीसाठी, स्वतःच्या हक्कासाठी, भारताच्या प्रगतीसाठी मोठ्या संख्येने मतदान करा. असे राहुल गांधी यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
https://twitter.com/AmitShah/status/1792365328842010742?s=19
अमित शाह काय म्हणाले?
भाजप नेते अमित शाह यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “आज मी लोकसभा निवडणुकीच्या 5 व्या टप्प्यात आपला मतदानाचा हक्क बजावणार असलेल्या महाराष्ट्रातील भगिनी आणि बांधवांना तुष्टीकरण, भ्रष्टाचार आणि घराणेशाहीमुक्त सरकार निवडण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करतो, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालेल आणि सत्तेसाठी आपल्या मूल्यांशी तडजोड करू नका. तुमचे एक मत देशाचा आणि राज्याच्या विकासाला नव्या उंचीवर नेण्यास मदत करेल.”
https://twitter.com/AUThackeray/status/1792377901175996882?s=19
आदित्य ठाकरेंचे आवाहन
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. “आज मतदानाचा दिवस. लोकसभेच्या निवडणूकीचा महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा. लोकशाही टिकवण्याची शेवटची संधी. मतदारांनी नक्की मतदानासाठी घराबाहेर पडा, विचारपूर्वक निर्णय घ्या आणि लोकशाही टिकावी ह्यासाठी भरभरून मतदान करा! धगधगणारी क्रांतीची ज्वाला पेटत रहायला हवी, हुकूमशाही गाडून टाकायला हवी!” असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.