पुणे, 27 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरासह जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. सध्या जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक धरणांमधील पाण्याचा विसर्ग कमी प्रमाणात करण्यात आला आहे. तरी देखील काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यानुसार, पाठबंधारे विभागाने पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील धरणांमधून केल्या जाणाऱ्या पाण्याच्या विसर्गाची माहिती दिली आहे. पावसाच्या परिस्थितीनुसार पाण्याचा विसर्ग कमी-जास्त प्रमाणात करण्यात येईल, असेही पाटबंधारे विभागाने यावेळी सांगितले आहे. दरम्यान ही आकडेवारी सकाळी 8 वाजताची आहे.
https://x.com/Info_Pune/status/1817081269647475112?s=19
खडकवासला धरणातून विसर्ग बंद
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेल्या खडकवासला धरणात आज सकाळी 9 वाजता 93.83 टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. खडकवासला धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. पवना धरण आज सकाळी 8 वाजता 82.45 टक्के भरले आहे. या धरणातून सकाळी 8 वाजेपर्यंत पाण्याचा विसर्ग सुरू केला नव्हता. तसेच पानशेत धरणात 90.42 टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. पानशेत धरणातून सुद्धा सकाळी 8 वाजेपर्यंत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला नव्हता.
आज सकाळी 8 वाजेपर्यंतची आकडेवारी
त्याचवेळी मुळशी धरण 80.55 टक्के भरले आहे. त्यामुळे सकाळी 8 वाजता मुळशी धरणातून 2 हजार 271 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. तसेच पुण्यातील बंडगार्डन येथून 19 हजार 719 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. दौंड धरणातून 87 हजार 764 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग चालू आहे. येडगाव धरणाच्या सांडव्यातून 1 हजार 400 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. वडज धरणाच्या सांडव्यातून 2 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग चालू आहे. चिल्हेवाडी धरणाच्या सांडव्यातून 1 हजार 388 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. कळमोडी धरणाच्या सांडव्यातून 766 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग चालू आहे. चासकमान धरणाच्या कालव्यातून 850 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गुंजवणी धरणाच्या सांडव्यातून 676 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग चालू आहे. तर वीर धरणाच्या सांडव्यातून 6 हजार 087 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. या सर्व धरणांमधील पाण्याचा विसर्ग हा पावसाच्या परिस्थितीनुसार कमी-जास्त होण्याची शक्यता आहे, असे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.