अक्षय कुमार, जान्हवी कपूर, शाहिद कपूर यांसारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई, 20 मे: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. देशात आज 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 49 जागांवर आज मतदान होत होत आहे. त्यासाठी देशातील सर्वच मतदान केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरूवात झाली असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. लोकसभेच्या 49 जागांपैकी मुंबईतील 6 जागांवर आजच्या दिवशी मतदान पार पडत आहे. त्यामुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आज मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी अक्षय कुमार, फरहान अख्तर, जान्हवी कपूर, शाहिद कपूर, राजकुमार राव यांसारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आज मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. तसेच या स्टार्सनी जास्तीत जास्त लोकांना मतदान करण्याचे आवाहनही केले आहे.

https://twitter.com/ANI/status/1792375951126585360?s=19

अक्षय कुमारने केले मतदान

भारतीय नागरिकत्व घेतल्यानंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने आज मुंबईत रांगेत उभा राहून मतदान केले. मतदान केल्यानंतर अक्षय कुमार म्हणाला की, “माझा भारत विकसित आणि सशक्त व्हावा अशी माझी इच्छा आहे. मी ते लक्षात घेऊन मतदान केले. लोकांनी त्यांना जे योग्य वाटेल त्यालाच मतदान करावे. मला वाटते की मतदान चांगले होईल,” अशी अपेक्षा अक्षय कुमारने व्यक्त केली. दरम्यान अक्षय कुमारला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारतीय नागरिकत्व मिळाले होते. यापूर्वी त्याच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व होते.

https://twitter.com/ANI/status/1792389278963769769?s=19

https://twitter.com/AHindinews/status/1792390094009368661?s=19

जान्हवी कपूरने बजावला मतदानाचा हक्क

मुंबईतील मतदान केंद्रावर सध्या चित्रपट कलाकार सातत्याने मतदान करत आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचाही समावेश आहे. जान्हवी कपूरने मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. अभिनेता राजकुमार राव याने आज मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर त्याने सांगितले की, “मतदान ही देशाप्रती आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे. आपण सर्वांनी मतदान केले पाहिजे. नॅशनल आयकॉनसाठी निवडणूक आयोगाने माझी निवड केल्याचा मला आनंद आहे. मी प्रत्येकाला घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन करतो.”

https://twitter.com/AHindinews/status/1792423020172288048?s=19

https://twitter.com/AHindinews/status/1792423021019578700?s=19

धर्मेंद्र – हेमा मालिनीने केले मतदान

यासोबतच बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र तसेच अभिनेत्री आणि मथुरा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार हेमा मालिनी यांनी मुंबईतील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. अभिनेता फरहान अख्तरने त्याची बहीण चित्रपट दिग्दर्शक झोया अख्तरसोबत मुंबईत मतदान केले. फरहान अख्तर म्हणाला की, “माझे मत सुशासनासाठी आणि जनतेसाठी काम करणाऱ्या सरकारसाठी आहे.” पुढे येऊन मतदान करा, असे आवाहन फरहान अख्तरने केले आहे.

https://twitter.com/AHindinews/status/1792404842562068687?s=19

शाहिद कपूरचे आवाहन

ज्येष्ठ अभिनेते परेश रावलही मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. मतदान न करणाऱ्यांना टॅक्स वाढवा, असे परेश रावल मतदान केल्यानंतर म्हणाले. अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिनेही मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. चित्रपट अभिनेता शाहिद कपूरने आज मतदान केले. शाहिदने मतदान केल्याचा फोटो इंस्टा स्टोरी मध्ये शेयर केला आहे. तसेच त्याने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. अभिनेता आणि शिवसेना नेते गोविंदाने मुंबईत मतदान केले. मतदान केल्यानंतर गोविंदाने लोकांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *