पॅरिस, 30 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) भारताची स्टार नेमबाज मनू भाकर हिने 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये इतिहास रचला आहे. ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकर देशातील पहिली खेळाडू ठरली आहे. यापूर्वी, मनू भाकरने या ऑलिम्पिक स्पर्धेत रविवारी (दि.27 जुलै) महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर आता मनू भाकरने सरबज्योत सिंग सोबत 10 मीटर एअर पिस्टल मिश्र गटात आणखी एक कांस्यपदक जिंकण्याची कामगिरी केली आहे.
https://x.com/issf_official/status/1818197727311720672?s=19
मनू भाकर आणि सरबज्योत सिंग जोडीचे सांघिक यश!
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज 10 मीटर एअर पिस्टल मिश्र गटात कांस्यपदकासाठी सामना झाला. या सामन्यात भारताच्या मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या जोडीने कोरियन जोडीदार ओ ये जिन आणि ली वून्हो यांचा 16-10 असा पराभव केला. या विजयामुळे मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या जोडीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले. मनू भाकरचे या स्पर्धेतील हे दुसरे कांस्यपदक आहे. ऑलिम्पिक इतिहासात दोन पदके जिंकणारी मनू पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. या कामगिरीबद्दल देशभरातून तिच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
https://x.com/India_AllSports/status/1809838617063457072?s=19
स्वातंत्र्यापूर्वी अशी कामगिरी झालेली
तर याच्याआधी 1900 मध्ये भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत प्रथमच सहभाग घेतला होता. तेंव्हा ही ऑलिम्पिकचे आयोजन पॅरिसमध्येच करण्यात आले होते. परंतू, त्यावेळी भारत स्वतंत्र झाला नव्हता. तेंव्हा भारतावर इंग्रजांचे राज्य होते. 1900 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत नॉर्मन प्रिचर्ड हा एकमेव भारतीय खेळाडू होता. त्यावेळी नॉर्मन प्रिचर्ड यांनी एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकली होती. त्यांनी 200 मीटर स्प्रिंट आणि 200 मीटर हर्डल्स या धावण्याच्या खेळात रौप्यपदक जिंकले होते. त्यांच्यानंतर मनू भाकरने आता एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकली आहेत. त्यामुळे एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके पटकावणारी मनू भाकर ही स्वतंत्र भारतातील पहिली खेळाडू ठरली आहे.