मुंबई, 04 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटी गावावर ड्रोनने टेहळणी केल्याचे निदर्शनास आले होते. अंतरवाली सराटीमध्ये ड्रोन फिरत असल्याने गावात भीतीचे वातावण निर्माण झाले होते. हा मुद्दा विधानसभेत देखील गाजला होता. त्यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आंतरवली सराटीमधील संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले होते. मनोज जरांगे यांना संरक्षण दिले आहे. तसेच पोलीस अधीक्षकांच्या मार्फत त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन जरांगे यांच्या सुरक्षेत सुधारणा केली जाईल, असेही शंभुराज देसाई यांनी त्यावेळी म्हटले होते.
https://www.facebook.com/share/v/9sTAsLhy3Az7QwQ9/?mibextid=oFDknk
अशी असणार त्यांची सुरक्षा
त्यानुसार, राज्य सरकारने आज मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेसाठी एक अधिक एक सशस्त्र पोलीस अंमलदार नेमण्यात आले असून, त्यांच्या वाहन ताफा सुरक्षेसाठी एक अधिक तीन सशस्त्र पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली आहे.
ड्रोन प्रकरणाची चौकशी सूरू
दरम्यान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आंतरवाली सराटी येथे ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जात असल्याचा मुद्दा मंगळवारी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यानंतर शंभूराज देसाई यांनी आज या संदर्भातील राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करून मनोज जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच आंतरवाली सराटी येथे रात्री अडीचच्या दरम्यान ड्रोनद्वारे सर्वेक्षण होत असल्याचे समजताच स्थानिक पोलीस पथक तिथे गेले. तेथील शिवारात पाहणी केली असता पोलीस पथकास ड्रोन आढळून आले नाहीत. तथापि, याबाबत संशयास्पद वाटणाऱ्या बाबींची चौकशी करण्यासाठी तीन स्वतंत्र पथके जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तयार केली असून त्याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती शंभूराज देसाई यांनी आज सभागृहात दिली.