सोलापूर, 07 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) मनोज जरांगे पाटील यांची सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी आज सोलापूर शहरात शांतता रॅली आणि सभा पार पडणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सोलापुर शहरातील सर्व सरकारी, खाजगी, अनुदानित व विना अनुदानित शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये व व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना आज (दि. 07 जुलै) सुट्टी देण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश सोलापूरचे अपर जिल्हादंडाधिकारी मनिषा कुंभार यांनी दिले आहेत.
https://x.com/Info_Solapur/status/1820851033448546799?s=19
या मार्गावरून शांतता रॅली
राज्य सरकारने काढलेल्या सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करून मराठा आरक्षणाबाबतचा अध्यादेश काढण्याचा आग्रही मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे बुधवारी सोलापूर शहरातून परवानगी दिलेल्या मार्गावरून शांतता रॅली आणि सभा घेणार आहेत. त्यांच्या या रॅलीला आणि सभेला परवानगी देण्यात आलेली आहे. त्यानुसार, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज बौक या मार्गावर शांतता रॅली पार पडणार आहे. त्यानंतर जरांगे पाटील हे सभा घेणार आहेत.
हा मार्ग बंद राहणार
त्यानंतर मनोज जरांगे सरस्वती चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे या मार्गावर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. रॅली कार्यक्रमाच्या ठिकाणी येणाऱ्या वाहनांचा अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत मराठा आरक्षण शांतता रॅली पार पडणार असल्यामुळे छ. संभाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.
सर्व शाळांना सुट्टी
या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी, अनुदानित व विना अनुदानित शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये व व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षतेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून कामकाज करावे. तसेच या आदेशांची अमंलबजावणी तात्काळ करण्यात यावी, असे निर्देश अपर जिल्हादंडाधिकारी मनिषा कुंभार यांनी दिले आहेत.