मनोज जरांगे यांचे पुन्हा एकदा उपोषण सुरू! अन्यथा विधानसभेच्या 288 जागा लढविणार, जरांगे पाटलांचा इशारा

जालना, 08 जून: (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. जरांगे पाटील यांनी आजपासून जालना जिल्ह्यातील त्यांच्या अंतरवाली सराटी या गावातून उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षण मिळेपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला. तत्पूर्वी, लोकसभा निवडणुकीच्या आधी मनोज जरांगे पाटील सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उपोषण सुरू केले होते. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण मागे घेतले होते. त्यानंतर त्यांनी सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आज पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

https://twitter.com/ANI/status/1799328737705800128?s=19

जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

राज्य सरकारने सगेसोयरे संदर्भात जी अधिसूचना काढली होती, त्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी हे उपोषण असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी दिला आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. तरी देखील जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलिसांनी परवानगी नाकारली

तत्पूर्वी, मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी उपोषण करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना उपोषण करण्याची परवानगी नाकारली होती. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या या उपोषणाबाबत आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी प्रशासनाला निवेदन दिले होते. यामध्ये त्यांनी मराठा आंदोलनामुळे गावातील जातीय सलोखा बिघडत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. दरम्यान, जरांगे पाटील यांनी आपण आमरण उपोषणावर ठाम असल्याचे म्हटले आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था बिघडू न देण्याची जबाबदारी ही प्रशासनाची असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *