जालना, 20 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आजपासून (20 जुलै) पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरूवात केली आहेत. जरांगे पाटील जालन्यातील त्यांच्या अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांनी सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारला 13 जुलैपर्यंतची मुदत दिली होती. 13 जुलैची मुदत समाप्त झाल्यामुळे मनोज जरांगे पाटील हे आजपासून पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्य सरकारचे टेन्शन वाढले आहे.
सगेसोयरेच्या अंमलबजावणीवर ठाम
मराठा आणि कुणबी एकच असून, मराठा आरक्षणावर आम्ही ठाम आहोत. तसेच राज्य सरकारने सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे, असे मनोज जरांगे यांनी आज सांगितले आहे. तसेच यावेळी जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील बांधवांना अंतरवाली सराटी गावाकडे न येण्याची विनंती केली आहे. कामाचे दिवस आहेत. सध्या राज्यात पाऊस पडलेला आहे. शेती मधील कामाचे दिवस आहेत. तसेच याठिकाणी पाऊस सुरू असल्याने तुमचे हाल होऊ नयेत. त्यामुळे अंतरवाली कडे कोणी येऊ नका, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे.
13 जुलैपर्यंतचा अल्टीमेटम दिला होता
याच्याआधी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीनुसार मनोज जरांगे यांनी त्यांचे उपोषण 13 जून रोजी स्थगित केले होते. त्यावेळी जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारला 13 जुलैपर्यंतची मुदत दिली होती. त्यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर त्यांना याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी 13 जुलैपर्यंतचा अल्टीमेटम देऊन उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, मागण्या मान्य न झाल्यामुळे ते आजपासून पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले आहेत.