जालना, 24 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण स्थगित केले आहे. याची घोषणा जरांगे पाटील यांनी आज (दि.24 जुलै) केली आहे. त्यावेळी मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी 13 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला आहे. सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 20 जुलैपासून त्यांच्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात बेमुदत उपोषण सुरू केले होते.
सलाईन लावून उपोषण करण्यात अर्थ नाही
दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे तसेच सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते. परंतू, त्यांची प्रकृती खालावत चालली असल्याने काल रात्री मनोज जरांगे यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी हात पाय धरून जबरदस्तीने सलाईन लावले होते. त्यामुळे जरांगे पाटलांनी आज सलाईन लावून उपोषण करण्यास नकार दिला आहे. सलाईन लावून उपोषण करण्यात काहीच अर्थ नाही. सलाईन लावून उपोषण करण्यापेक्षा उपोषण सोडलेले बरे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. याची घोषणा त्यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे.
13 ऑगस्टपर्यंतची मुदत
मनोज जरांगे पाटील हे सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. यासाठी त्यांनी गेल्या काही दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. तर जरांगे पाटलांनी आता राज्य सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी 13 ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने या वेळेत आपल्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यांच्या मागण्या राज्य सरकार 13 ऑगस्टपर्यंत पूर्ण करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे आता पुढील काही दिवस रुग्णालयात उपचार घेणार आहेत. त्यानंतर ते राज्याचा दौरा करणार आहेत.