जालना, 25 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) कुणबी मराठा आरक्षण संदर्भातील सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाच्या आज 16 वा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी जरांगे पाटील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
जरांगे पाटलांच्या आरोपांमुळे खळबळ
देवेंद्र फडणवीस यांचा सलाईनमधून विष देण्याचा आणि माझा एन्काऊंटर करण्याचा डाव असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना एवढीच खुमखुमी आहे ना, तर मी बैठक संपल्यावर सागर बंगल्यावर येतो मला मारून टाका, अशा शब्दांत जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे उपोषण स्थळावरून उठून मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी मोठ्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
मला संपवण्याचा डाव: जरांगे पाटील
मराठ्यांचा दरारा संपवण्याचे त्यांचे स्वप्न आहे. यामध्ये शिंदेंचे दोन चार काही लोक असून अजित पवारांचेही दोन आमदार सामील असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. सगेसोगरेतून आरक्षण द्यायचं नाही, 10 टक्के आरक्षण मराठ्यांवर लादायचं, पण हे पोरगं ऐकतंच नाही. हे पोरगं संपलं पाहिजे, नाहीतर त्याचा गेम तरी करावा लागल, नुसता याला बदनाम तरी करावा लागल, नुसता याला उपोषणात तरी मरु द्यावं लागेल. नाहीतर याला सलाईनमधून विष देऊन तरी मारावं लागेल, म्हणून मी परवा रात्रीपासून सलाईन देखील बंद केली. तसेच माझा एन्काऊंटर करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे. असा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे.