मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा आज पुण्यात मुक्कामी; पुणे शहराच्या वाहतुकीत बदल

पुणे, 23 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे 26 जानेवारी पासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी 20 जानेवारी रोजी त्यांच्या अंतरवाली सराटी या गावातून मुंबईकडे पदयात्रा काढली आहे. त्यांच्या पदयात्रेचा आज चौथा दिवस आहे. जरांगे पाटलांची ही यात्रा सध्या जालना, बीड आणि अहमदनगर हे जिल्हे ओलांडून पुणे जिल्ह्यात दाखल झाली आहे. कालच्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम रांजणगाव येथे होता. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या या पदयात्रेला मराठा समाजाचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्याच्या या यात्रेत मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

जरांगे पाटील आज पुण्यात मुक्कामी

मनोज जरांगे पाटील यांनी आज रांजणगाव हून मुंबईकडे प्रस्थान केले. त्यापूर्वी, त्यांनी रांजणगाव गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणपतीची आरती देखील केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचा ताफा पुण्याकडे रवाना झाला. जरांगे पाटलांच्या या पदयात्रेचा आजचा मुक्काम पुण्यातील चंदननगर (खराडी) येथे असणार आहे. तसेच त्यांच्या यात्रेचा उद्याच्या दिवशीचा (दि.24) मुक्काम लोणावळा येथे असणार आहे.

पुण्याच्या वाहतुकीत बदल!

मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव वाहनांसह सहभागी होणार असल्याने मार्चा मार्गावर व आजुबाजुचे परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, 23 आणि 24 जानेवारी रोजी पुण्यातील वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय पुणे शहर वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. मराठा आरक्षण पदयात्रा जसजशी पुढे मार्गस्थ होईल, त्याप्रमाणे मोर्चाचे मागील वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे. तरी वाहनचालकांनी खाली नमुद केलेल्या वाहतूक बदलांचा अवलंब करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

https://twitter.com/PuneCityTraffic/status/1749346312678703539?s=19

दि. 23/01/2024 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून आवश्यकतेप्रमाणे अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक खालीलप्रमाणे वळविण्यात येईल.

१) मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरुन तसेच कोल्हापूर, सातारा येथुन अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कात्रज – खडी मशिन चौक – मंतरवाडी फाटा – हडपसर मार्गे सोलापूर रोडने केडगांव चौफुला – नाव्हरे – शिरुर मार्गे जातील.
२) वाघोली, लोणीकंद मार्गे अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची थेऊर फाटा (सोलापूर रोड) येथुन वाहतूक केडगांव चौफुला – नाव्हरा मार्गे शिरुर ते अहमदनगर अशी वळविण्यात येईल.
3) पुणे शहरातून अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने खराडी बायपास उजवीकडे वळण घेवून मगरपट्टा चौक – डावीकडे वळण घेवून सोलापूर रोडने यवत – केडगांव चौफुला – नाव्हरे – शिरूर मार्गे जातील.

https://twitter.com/PuneCityTraffic/status/1749762469558718654?s=19
23/01/2024 रोजी मराठा आरक्षण मोर्चा चोखीदाणी, खराडी परिसरामध्ये मुक्कामी राहणार आहे व पुढे दि. 24/01/2024 रोजी पुणे शहरामधुन पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीमध्ये जाणार आहे. त्याअनुषंगाने सर्व प्रकारची वाहतूक दि. 24/01/2024 रोजी आवश्यकतेप्रमाणे खालीलप्रमाणे वळविण्यात येईल.

1) अहमदनगर कडून पुणे शहराकडे येणारी सर्व वाहने थेऊर फाटा (लोणीकंद) येथुन केसनंद – थेऊर मार्गे सोलापूर रोड अशी वळविण्यात येतील.
२) वाघोली परिसरामधील वाहने वाघोली – आव्हाळवाडी – मांजरी खुर्द – मांजरी बुद्रुक – केशवनगर – मुंढवा चौक अशी वळविण्यात येतील.
३) पुणे शहरामधुन अहमदनगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना चंद्रमा चौकातून आळंदी रोड जंक्शन, विश्रांतवाडी – धानोरी – लोहगांव – वाघोली मार्गे अहमदनगरकडे अशी वळविण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *