बीड, 12 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जरांगे पाटील यांच्यावर बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील थोरात रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील हे काल अंबेजोगाई येथे सभेसाठी आले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी मराठा समाज बांधव प्रार्थना करीत आहे.
https://twitter.com/ANI/status/1734423638311653838?s=19
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या महिन्यात उपोषण केले होते. हे उपोषण मागे घेताना त्यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षण लागू करण्यासाठी 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर जरांगे पाटील हे गेल्या महिन्यापासून राज्यभरात सभा घेत आहेत. मनोज जरांगे पाटील यांची काल अंबासाखर कारखाना येथे सभा पार पडली. त्यांच्या या सभेला मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. ही सभा संपल्यानंतर जरांगे पाटील यांना अचानकपणे अस्वस्थ वाटू लागले.
त्यानंतर त्यांना अंबेजोगाई येथील थोरात रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांना सध्या थकवा आणि अशक्तपणा जाणवत असून, त्यांच्या आता विविध तपासण्या केल्या जात आहेत. डॉक्टरांनी जरांगे पाटील यांना पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. तर दुसरीकडे मात्र, मनोज जरांगे पाटलांनी प्रकृती ठिक नसली तरी नियोजित दौऱ्याला जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.