जालना, 15 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे सध्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. जोवर या अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर होत नाही. तोवर अन्न, पाणी घेणार नाही, असा पवित्रा जरांगे पाटील यांनी घेतला आहे. तसेच त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास देखील नकार दिला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती अजून बिघडली आहे. आजही त्यांनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यास नकार दर्शवला आहे. यावेळी त्यांनी डॉक्टरांच्या पथकाला माघारी लावले. त्यामुळे सध्या चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
जरांगे पाटलांची प्रकृतीबाबत चिंता
दरम्यान, नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी आज खूप आग्रह केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी थोडे पाणी घेतले. मात्र, तेंव्हा जरांगे पाटलांना पाणी गिळताना त्रास झाला होता. यावेळी त्यांनी कसलेही वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला. आधी अध्यादेश जारी करा, मग सलाईन लावतो, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. गेली सहा दिवसांपासून उपोषण सुरू असल्याने जरांगे पाटलांना सध्या अशक्तपणामुळे ग्लानी आलेली आहे. तसेच त्यांच्या पोटात देखील दुखत आहे. त्यांना डोळे उघडता येत नाही. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत मराठा समाज काळजीत पडला आहे. या पार्श्वभूमीवर, जरांगे पाटलांना पाणी घेण्याचा आग्रह लोक करीत आहेत. यावेळी लोक ‘पाणी घ्या पाणी घ्या’ च्या घोषणा उपोषणस्थळी देत आहेत.
जरांगे पाटील उपोषणावर ठाम
तत्पूर्वी, 10 जानेवारी पासून मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत सरकार सगेसोयाऱ्यांच्या अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करत नाही, तोपर्यंत उपोषणावर ठाम राहणार असल्याची भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात मराठा समाजाकडून सध्या विविध आंदोलने केली जात आहेत. तसेच जरांगे पाटलांच्या या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी काल (दि.15) सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी कालच्या दिवशी बंद पाळण्यात आला.