मनोज जरांगे पाटील आज मुंबईकडे रवाना; आजपासूनच उपोषण करण्याची मनःस्थिती पण…

जालना, 20 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आज अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे रवाना होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. अंतरवली सराटीपासून आमरण उपोषण करावे, अशी माझी शंभर टक्के मनःस्थिती झाली आहे. पण त्यासंदर्भातील निर्णय मराठा समाजाला विचारून घेणार असल्याचे जरांगे पाटील यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी मराठा समाजाला शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.

 

इतके निर्दयी सरकार कसे असू शकते?

“राज्यात कुणबीच्या 54 लाख नोंदी मिळाल्यात. गेल्या 45 वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी लढत आहे. करोडोच्या संख्येने मराठा समाज एकत्र आला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 250 ते 300 जणांनी जीवाचे बलिदान दिले आहे. तरी हे सरकार इतके निर्दयी कसे असू शकते? हे पाहून वाईट वाटते. ज्या सरकारला मराठा समाजाने गादीवर बसविले, ते लोक नोंदी मिळाले असताना ही आरक्षण देऊ शकत नाही. याच्यापेक्षा निर्दयीपणा काय असायला पाहिजे? आम्ही हे शांततेत आंदोलन करतोय. आमरण उपोषण आणि मुंबईकडे जाण्याची घोषणा करून एक महिना झाला तरीही हे सरकार गांभीर्याने घेत नाही. इतका निर्दयीपणा सरकारमध्ये आहे.” असे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

जरांगे पाटलांच्या डोळ्यात आले अश्रू!

“मी लढायला आणि मारायला कधीच भीत नाही. आरक्षणासाठी लोकांनी आत्महत्या केली असताना सरकारला झोप सुद्धा यायला नाही पाहिजे. तरी देखील तुम्ही सहजपणे आंदोलन हाताळत आहात. मराठ्यांना तुम्ही तात्काळ आरक्षण दिले असते, तर आज मराठ्यांना मुंबईकडे जाण्याची वेळ आली नसती. मुंबईत काही झालं तरी चालेल, मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. मी असेल किंवा नसेल हे मला माहित नाही. मात्र मराठ्यांनी ही एकजूट कायम ठेवावी. माझ्या छातीवर गोळ्या जरी पडल्या, तरी मी मागे हटणार नाही. मला मराठ्यांची पोरं मोठी झालेली पहायची आहेत. आरक्षण घेतल्या शिवाय आता मागे हटायचे नाही,” असे बोलून जरांगे पाटील यांच्या डोळ्यात यावेळी अश्रू आले होते.

आजपासूनच उपोषण करण्याची तयारी

दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करण्यासाठी आज अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे पायी रवाना होत आहेत. त्यानंतर ते काही काळ गाडीतून प्रवास करतील. मनोज जरांगे पाटील हे 26 जानेवारी रोजी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यानंतर ते मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. माझ्या मनाची आजपासूनच उपोषण करण्याची तयारी आहे. मात्र, या संदर्भातील निर्णय मराठा समाजाला विचारून घेणार असल्याचे जरांगे पाटलांनी म्हटले आहे. तर जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी करोडोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईत येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सरकारची काळजी वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *