जालना, 20 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) विधानसभेत आज मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. तर दुसरीकडे मात्र राज्य सरकारने या विशेष अधिवेशनात सगेसोयरे अधिसूचनेबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील सध्या आक्रमक झाले आहेत. यावेळी त्यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात राज्य सरकारने सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करणे गरजेचे होते. मात्र, सरकारने तसे केले नाही. त्यामुळे आजपासून वैद्यकीय उपचार घेणे बंद करत असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/ANI/status/1759865529131520237?s=19
सरकारने फसवणूक केली: जरांगे पाटील
यावेळी जरांगे पाटलांनी सलाईन देखील काढली आहे. तर आंदोलनाची पुढील दिशा उद्या ठरविण्यात येणार असल्याची माहिती जरांगे यांनी यावेळी दिली. दरम्यान, कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातील सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे सध्या त्यांच्या अंतरवाली सराटी या गावात उपोषण करीत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे. राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. तुम्ही अधिसूचना काढली आणि त्याची आता अंमलबजावणी का करत नाही? मग तुम्ही अधिसूचना काढलीच कशाला? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
मग अधिसूचना काढलीच कशाला? जरांगे पाटलांचा सवाल
तुम्हाला हे जे आरक्षण द्यायचे होते तर, सगेसोयरे संदर्भातील अधिसूचना कशाला काढली? असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले. तसेच राज्य सरकारने आज मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकले नाही, तर मराठा समाजातील मुलांचे नुकसान होईल, असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगेसोयरे अधिसूचनेवर घाई गडबडीत निर्णय घेता येणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच सगेसोयरे अधिसूचनेबाबत 6 लाख हरकती व सूचना आल्या असून, त्याची छाननी आणि प्रक्रिया करून सगेसोयरे अधिसूचनेवर निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. सोबतच मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.