मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले; गुलाल उधळला गेलाय, त्याचा अपमान होऊ देऊ नका, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवी मुंबई, 27 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षण संदर्भातील सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडले आहे. सग्यासोयऱ्यांचे सरकारने जे राजपत्र काढलंय. त्यात ज्याची नोंद आहे त्याच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळं हा विजयी गुलाल उधळला गेलाय. या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, अशी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. हा अध्यादेश कायम राहिला पाहिजेत. अशी मागणी जरांगे पाटील यांनी यावेळी केली. तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांची नवी मुंबईतील वाशी भेट घेतली. त्यावेळी जरांगे पाटील यांनी कालपासून सुरू केलेले उपोषण मागे घेतले आहे. याप्रसंगी, मंत्री गिरीश महाजन, दीपक केसरकर, विविध पदाधिकारी आणि मराठा बांधव उपस्थित होते. त्यावेळी मराठा बांधवांनी मोठा जल्लोष केला.

https://twitter.com/ANI/status/1751103650376888754?s=19

मुख्यमंत्र्यांनी अध्यादेशाची प्रत दिली

तत्पूर्वी, मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना सर्वांसमोर मराठा आरक्षण संदर्भातील अध्यादेशाची प्रत दिली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची गळाभेट घेतली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा पार पडली.

मराठा बांधवांनी त्यासाठी गेल्या साडेचार महिने हा संघर्ष केला आहे!

“सरकारला एकच विनंती आहे, माझ्या मराठा बांधवांनी मोठा संघर्ष केला आहे. 54 लाख मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात यावे. अशा लोकांच्या परिवारातील लोकांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. ज्यांची नोंद सापडली आहे त्यांच्या सग्यासोयाऱ्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी आपण येथे आलो होतो. मराठा बांधवांनी त्यासाठी गेल्या साडेचार महिने हा संघर्ष केला आहे. सगे सोयरे आरक्षणात यावेत, यासाठी अध्यादेश होणे गरजेचे होते.” असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

https://twitter.com/ANI/status/1751128046739087596?s=19

त्या सर्वांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले नाही

“300 पेक्षाही जास्त मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या केल्यात त्यांनी बलिदान दिले आहे. मायभगिणींचं कुंकू पुसले आहे. या सर्वांची स्वप्नं साकार करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती. अण्णासाहेब पाटील, विनायक मेटे, अण्णासाहेब जावळे यांच्यासह 300 पेक्षाही जास्त मराठ्यांच्या पोरांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देण्याची मराठ्यांची जबाबदारी होती.” असे ते यावेळी म्हणाले. नोंद मिळाली आहे त्या सग्यासोयाऱ्यांतील सर्वांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील अध्यादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे मराठा समाजाच्या वतीने आभार मानतो. आम्ही ओबीसी आणि मराठ्यांमध्ये तेढ निर्माण होऊ देणार नाही, पण ते आमच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण असे होणार नाही. ओबीसी आणि मराठ्यांमध्ये खूप प्रेम आहे, आम्ही सगळे एकत्र आहोत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *