येत्या 20 जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसणार, मनोज जरांगे पाटील यांची घोषणा

बीड, 23 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मनोज जरांगे पाटील यांची आज बीडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत जरांगे पाटील यांनी आपण येत्या 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यासोबतच त्यांनी यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देखील टीका केली आहे. तसेच मराठा आरक्षण आंदोलनात राज्य सरकारने निष्पाप लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत, असा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला. या सभेला मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.



येत्या 20 जानेवारीपासून मी मुंबईतील आझाद मैदान याठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहे, अशी घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यामुळे मराठा समाजाने शांततेत मुंबईत यावे. मराठा समाजाला कोणताही डाग लागणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी. असे ते यावेळी म्हणाले. गेल्या आंदोलनात निष्पाप पोरांना गुंतवण्याचे षडयंत्र राज्य सरकारने केले. आज लाखोंच्या संख्येने मराठा समाज बीडमध्ये दाखल झाला आहे. मराठ्यांना काही करायचे असते तर आज केले असते की नसते? उलट मराठा समाजाने आज शांततेत रॅली काढली आहे. मराठ्यांना राज्यात शांतता हवी आहे. असे मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.



या सभेत जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. राज्य सरकार छगन भुजबळ यांचेच ऐकत आहे. छगन भुजबळ यांनी आमच्या नादाला लागू नये. मंत्री गिरीश महाजन म्हणाले होते की, जरांगे पाटील तुम्ही काही बोलू नका मी छगन भुजबळ यांना समज दिली आहे. त्यामुळे मी शांत बसलो होतो. मात्र मी गप्प बसलो की ते सुरू करतात. मराठा आरक्षण मिळेपर्यंत शांततेत आंदोलन करा, छगन भुजबळ काय करतात ते मला बघायचेच आहे, असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले.



राज्य सरकारकडे आता 20 जानेवारीपर्यंतचा वेळ आहे. त्यामुळे 20 तारखेच्या आत आरक्षण देता आलं तर बघा. आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. आता आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे राज्य सरकार आता कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *