जालना, 14 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. गेल्या 5 दिवसांपासून त्यांचे हे उपोषण सुरू आहे. नोंदी असलेल्या सर्व सग्यासोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, यासंदर्भातील अध्यादेश राज्य शासनाने त्वरित लागू करावा, यासाठी मनोज जरांगे पाटील हे सध्या उपोषण करीत आहेत. या उपोषण काळात त्यांनी अन्न, पाणी आणि वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दर्शवला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती सध्या बिघडली आहे. त्यांच्या नाकातून आता रक्तस्त्राव होत आहे. या पार्श्वभूमीवर, मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
जरांगे यांच्या प्रकृतीची चिंता वाढली
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अधिकच खालावली असून, त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत आहे. तसेच त्यांना बोलताना देखील त्रास होत आहे. डॉक्टरांचे एक पथक सध्या तातडीने अंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहे. मात्र, जरांगे पाटलांनी कसल्याही प्रकारचे वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. राज्य सरकार सग्यासोयऱ्यांचा अध्यादेश काढण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला न्याय देत नाही, तोपर्यंत मी हे उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.
फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलावणार: एकनाथ शिंदे
तत्पूर्वी, मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाचा आढावा घेतल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी फेब्रुवारीमध्ये राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सांगितले होते. तर मागासवर्गीय आयोग त्यांच्या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य सरकारला लवकरच देणार आहे. त्यामुळे राज्य सरकार मनोज जरांगे पाटील यांची मागणी पूर्ण करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.