मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, पण त्याही पेक्षा ते सच्चे शिवसैनिक होते – उद्धव ठाकरे

बुलढाणा, 23 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांचा नियोजित विदर्भ आणि मराठवाडा दौरा रद्द केला आहे. उद्धव ठाकरे हे आता मुंबईकडे रवाना झाले आहेत. तत्पूर्वी, बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली. मनोहर जोशी हे एक सच्चे शिवसैनिक होते, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

https://twitter.com/OfficeofUT/status/1760911673551098044?s=19

संकटाच्या काळात देखील ते पक्षासोबत निष्ठेने उभे राहिले!

मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष होते, मनोहर जोशी केंद्रीय मंत्री होते, पण त्याही पेक्षा ते सच्चे शिवसैनिक होते, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत. कोणत्याही पक्षाच्या किंवा आयुष्याच्या जीवनात चढ-उतार येत असतात. संकटाच्या काळात देखील ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षासोबत निष्ठेने राहिले. एवढंच नव्हे, ज्यावेळेला शिवसेनाप्रमुखांना बेळगाव आंदोलनादरम्यान अटक झाली होती, त्यावेळेस शिवसेनाप्रमुखांसोबत मनोहर जोशी आणि दत्ता साळवी हे देखील होते.एकूणच जीवाला जीव देणारे हे शिवसैनिक आपल्यातून निघून जात आहेत, हे फार मोठे दुदैव आहे. त्यांच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली: उद्धव ठाकरे

“आज मी बुलढाण्यात असून मी लवकरात लवकर मुंबईला पोहचण्याचा प्रयत्न करतोय. पूर्ण शिवसेनेच्या वतीने, शिवसेना परिवाराच्या वतीने तसेच ठाकरे कुटुंबियांच्या वतीने मनोहर जोशी यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान , मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर आज दुपारी 2 वाजल्यानंतर दादर स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *