मुंबई, 06 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची संयुक्त सभा आज (दि.06) सायंकाळी मुंबईत पार पडली. या सभेतून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
https://x.com/ANI/status/1854166481711530251?t=QzYH6lFOabvuSiKZcb77pw&s=19
महाविकास आघाडीकडून मोठ्या घोषणा
यावेळी महाविकास आघाडीच्या या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये महिलांना दरमहा 3 हजार रुपये, महिला व मुलींना मोफत बस प्रवास, शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्ज परतफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन, जातीनिहाय जनगणना, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करणार, बेरोजगार तरूणांना दरमहा 4 हजार रुपये, 25 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा आणि मोफत औषधे यांसारख्या मोठ्या घोषणा या जाहीरनाम्यात करण्यात आल्या आहेत.
महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातील वैशिष्ट्ये
1) राज्यातील महिलांना दर महिन्याला प्रत्येकी 3000 रुपये देणार.
2) महालक्ष्मी योजनेंतर्गत महिला व मुलींसाठी मोफत बस प्रवास देणार.
3) बेरोजगार तरूणांना दरमहा 4000 रुपयांपर्यंतची मदत देणार.
4) जातीनिहाय जनगणना करणार.
5) 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटविण्यासाठी प्रयत्नशील.
6) राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्ज परतफेडीसाठी 50,000 रुपयांचे प्रोत्साहन देणार.
7) 25 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा आणि मोफत औषधे देणार.