पुणे, 14 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील सिंहगड रोड पोलिसांनी रेकार्डवरील गुन्हेगाराकडून एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करून त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोमनाथ भिमा चांदणे (वय 21, रा. वडगाव पठार, पुणे) या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 40 हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल आणि 2 हजार रुपयांचे दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर आणि त्यांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार राहुल ओलेकर आणि विनायक मोहीते यांना माहिती मिळाली की, सोमनाथ चांदणे हा वडगाव पठार येथील एका पत्र्याच्या शेडजवळ संशयास्पदरीत्या थांबला आहे आणि त्याच्याकडे गावठी पिस्तूल आहे. याची माहिती पोलिसांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
त्यानुसार या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सापळा रचला आणि सदर ठिकाणी गुप्तपणे निरीक्षण केले. काही वेळाने बातमीतील वर्णनाशी मिळताजुळता एक व्यक्ती संशयास्पदरीत्या उभा असल्याचे निदर्शनास आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे पोलिसांची त्याच्यावर अधिक संशय बळावला. त्यावेळी पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 40 हजाररुपये किंमतीचे गावठी पिस्तूल आणि 2 रुपये किंमतीच्या दोन जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तसेच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून त्याची अधिक चौकशी सुरू असून, त्याने शस्त्र कोठून आणले? त्याचा उद्देश काय होता? आणि त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का? याचा तपास केला जात आहे.