मालवण, 26 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज (दि.26) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कोसळला आहे. यासंदर्भात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट केले आहे. मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून आम्ही तेव्हाच पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती, अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी या ट्विटमधून दिली आहे.
https://x.com/YuvrajSambhaji/status/1828021931414876596?s=19
तेव्हाच पंतप्रधानांकडे मागणी केलेली…
पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला! मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार! असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच आता त्याठिकाणी पुन:श्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे. पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इर्ष्येत परत काही गडबड करू नये. उशीर होऊदे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी केली आहे.
12 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधानांना पत्र लिहिले होते
तत्पूर्वी, सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर 4 डिसेंबर 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी 12 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भात एक पत्र लिहिले होते. “4 डिसेंबर 2023 रोजी भारतीय नौदल दिनाचे औचित्य साधून मालवण नजीक असलेल्या राजकोट या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्णाकृती मूर्तीचे आपल्या हस्ते अनावरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या स्मृती जपण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुकच आहे.” असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
घाईगडबडीत या शिल्पाचे काम केल्याचे पत्रात नमूद केले होते
वस्तुतः महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळपास शंभर वर्षांपूर्वी देखील तयार केलेल्या अनेक पूर्णाकृती भव्य मूर्ती पहावयास मिळतात. कित्येक मूर्ती ह्या शिल्पकलेचा उत्तम नमुना म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्राच्याच मातीत जन्मलेल्या अनेक नामांकित शिल्पकारांनी आधुनिक साधनांची कमतरता असतानाही ही शिल्पे साकारलेली आहेत. मात्र राजकोट येथे आपण अनावरण केलेले शिल्प हे उत्तम शिल्पकलेच्या मानदंडात बसत नसल्याचे दिसून येत आहे. कित्येक आधुनिक साधने उपलब्ध असतानाही या शिल्पाची घडण प्रभावी व रेखीव दिसत नाही. अत्यंत कमी वेळात व घाईगडबडीत या शिल्पाचे काम केल्याचे दिसते आहे. मूर्तीच्या अनेक भागांत कमतरता दिसून येतात. मूर्तीचे हात, पाय व चेहरा यांमध्ये प्रमाणबद्धता दिसत नाही. हेच शिल्प कायस्वरूपी आहे, की केवळ आपल्या हस्ते अनावरण कार्यक्रम पार पाडण्यासाठी बसविलेले तात्पुरते शिल्प आहे व नंतर याठिकाणी चांगले शिल्प बसविले जाणार आहे, याचा उलगडा होत नाही. तरी, शासनाच्या एखाद्या तज्ञ समितीने परिपूर्ण परीक्षण करून उत्तम शिल्पकलेचा नमुना म्हणून गणले जाईल असे छत्रपती शिवाजी महाराजांस साजेसे नवे शिल्प याठिकाणी लवकर प्रतिष्ठापित करावे, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती.