बारामती, 09 मे: (अभिजित कांबळे) बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस स्टेशन परिसरातील खांडज येथे दिनांक 7 मे 2025 रोजी सकाळी 7 वाजता एका शेतविहिरीत अज्ञात पुरूषाचे प्रेत आढळून आल्याची माहिती ग्रामस्थांनी गावचे पोलीस पाटील मुनेश राऊत यांना दिली. त्यांनी सदरची माहिती माळेगाव पोलीस ठाण्यात कळवली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी दिली माहिती
पोलिसांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढून तपासणी केली असता, मृताच्या डोक्याला आणि चेहऱ्यावर मारहाण केल्याचे खुणा दिसून आल्या तसेच गळ्याला काळी साडी व दगड बांधलेले आढळले. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे निदर्शनास आले. पुढील तपासादरम्यान मृताची ओळख मारूती साहेबराव रोमन (वय 58, रा. राऊतवस्ती, खांडज) अशी पटली. त्यांच्या मुलाने विजय मारुती रोमन (वय 31) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरूद्ध खुनाची फिर्याद दाखल केली. यावरून भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 238 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलीस तपासात माहिती उघड
दरम्यान, शवविच्छेदन अहवालानुसार मारूती रोमन यांचा मृत्यू टणक वस्तूने डोक्यात मारल्याने झाल्याचा संशय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच मृत व्यक्तीस शेवटचे कोणी पाहिले होते? याबाबत सखोल चौकशी केली असता, तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय खात्रीलायक माहिती प्राप्त झाली की, घटना घडण्यापूर्वी मृत मारूती रोमन हे खांडज या गावात मजुरीसाठी बाहेरून आलेल्या काही व्यक्तींसोबत फिरताना दिसले होते.
त्यानुसार, पोलीस पथकाने खांडज परिसरात चौकशी केली असता, घटनास्थळी मजुरीसाठी आलेल्या नवनाथ शिवाजी घोगरे (वय 25, रा. कार्ले भाजी, लोणावळा) व अनिल गोविंद जाधव (वय 35, रा. आंबेवाडी, ता. रोहा, जि. रायगड) हे दोन पुरूष संशयाच्या भोवऱ्यात आले. त्यांच्याकडून टाळाटाळीची उत्तरे मिळाल्याने त्यांच्या मजुर महिला सहकाऱ्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीत विसंगती आढळल्याने पोलिसांनी अधिक तपास केला.
हत्येचे कारण स्पष्ट
पोलीस तपासात उघड झाले की, मृत मारूती रोमन याने आरोपी नवनाथ घोगरे याच्या आईकडे शरीर सुखाची मागणी केली होती. हा प्रकार संबंधित महिलेने तिच्या मुलास सांगितल्यानंतर संतापाच्या भरात आरोपींनी मारूती रोमन यांचा निर्जन स्थळी दगडाने ठेचून खून केला. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचे कपडे जाळण्यात आले आणि मृतदेह विहिरीत फेकण्यात आला. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार भोर हे करीत आहेत. ही संपूर्ण यशस्वी कारवाई बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.