बारामती, 17 जून: (अभिजित कांबळे) माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराचा औपचारिक शुभारंभ 14 जून रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला आहे. हा प्रचार शुभारंभ पाहुणेवाडी येथील ओमसाई लॉन्स येथे दुपारी 3.30 वाजता पार पडला.
या निवडणुकीत ‘ब’ वर्ग प्रवर्गातून अजित पवार यांनी उमेदवारी स्वीकारली असून, ते उमेदवार म्हणून प्रथमच सभासदांशी थेट संवाद साधणार आहेत. त्यामुळे या प्रचारसभेकडे कार्यक्षेत्रासह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
या सभेद्वारे अजित पवार यांचा माळेगावमधील उमेदवार म्हणून अधिकृत प्रचार आरंभ होणार आहे. त्यांच्या भाषणातून ते कोणती दिशा आणि भूमिका मांडतात याकडे सर्वांच्या अपेक्षा लागून राहिल्या आहेत.
दरम्यान, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी श्री निळकंठेश्वर पॅनलचे संचालक पदाचे उमेदवार आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. राष्ट्रवादी भवन, कसबा येथे आयोजित पत्रकार परिषदेत पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी ही घोषणा केली.
यावेळी राजवर्धन शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत उमेदवारांची माहिती दिली. पॅनलच्या वतीने सादर करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी लवकरच अधिकृतरित्या प्रसिद्ध केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक; श्री निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत
