बारामती, 26 ऑगस्टः बारामती शहरात काही गुन्हेगार वारंवार गुन्हे करत असतात, त्यांना प्रचलित उन-कायद्याचे काहीच वाटत नाही. बारामती शहर पोलिसांनी दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांची यादी अद्यावत केलेली आहे. या यादीत तडीपारी, मोक्का याप्रमाणे कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी केलेली आहे.
माळेगाव साखर कारखान्यांकडून 3100 रुपयांचा दर जाहीर
दरम्यान, दोन वर्षापासून बारामती तालुक्यातील मळद या ठिकाणी राहून शहरासह परिसरात दादागिरी करणारा आकाश उर्फ भोऱ्या जाधव (वय 27) हा वारंवार जेलमध्ये जाऊन सुद्धा त्याची दहशत कमी होत नव्हती. तसेच त्याच्यावर दरोडा, जबरी चोरी, खंडणी, मालमत्तेची तोडफोड, नासधूस, मारहाण, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी, चोरी, जुलूम, जबरदस्ती, हत्यारा सहित लुटमार आदी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. आगामी निवडणुकीत लोकांमध्ये दहशत माजवण्यासाठी तो तयार होता, असे त्याच्या कृतीतून दिसून येत होते. दहीहंडीमध्ये सुद्धा त्याच्या दहीहंडी आयोजनावरून बराच वादंग निर्माण झालेला होता.
असा गुन्हेगार उदयाला येऊ नये, म्हणून त्याला महाराष्ट्र झोपडपट्टी कायदा (एमपीडीए) अन्वये स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव बारामती शहरचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यासह अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे सादर केला. त्यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून परिपूर्ण असा प्रस्ताव जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनीही त्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे आरोपी आकाश उर्फ भोऱ्या जाधव याला येरावडा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे.
सदरचा परिपूर्ण प्रस्ताव बारामती शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, युवराज घोडके, देवेंद्र खाडे, संजय जगदाळे, दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, अतुल जाधव, दशरथ इंगोले, संजय जाधव, प्रमोद राऊत, बंडू कोठे, तुषार चव्हाण, मनोज पवार, चालक यशवंत पवार यांनी केलेला आहे.