मुंबई, 13 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) राज्य सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला सध्या महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला प्रत्येकी 1500 रुपये देण्यात येणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आमदार रवी राणा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आम्हाला मतदान केले नाही तर तुमच्याकडून या योजनेचे 1500 रुपये काढून घेऊ, असे खळबळजनक विधान रवी राणा यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
https://x.com/VijayWadettiwar/status/1822941166947410362?s=19
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात रवी राणा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. तुम्ही मत दिले नाही तर 1500 रुपये तुमच्याकडून काढून घेऊ, अशी स्पष्ट धमकी आज महायुतीतील आमदार रवी राणा यांनी दिल्याचे पुढे आले आहे. रवी राणा यांनी सांगावे, हा सरकारचा पैसा आहे की हा पैसा ह्यांच्या बापाचा आहे? असे विजय वडेट्टीवार यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच रवी राणा, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या घरातून लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपये देण्यात येत आहे का? अशी टीका ही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
राज्यातील बहिणीची माफी मागावी
आज महायुतीची निती दिसली, निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी योजना आणली. बहिणींना फसवण्यासाठी योजना आणली. रवी राणा जे बोलले ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या मनातील बोलले आहेत. मतांची झाली कडकी, म्हणून बहीण झाली लाडकी, आमच्या बहिणी दीड हजार रुपयाला मत विकतील का? रवी राणा जे बोलले ते महाराष्ट्रातील महिलांचा अपमान आहे, आमच्या बहिणीचा अपमान आहे. महायुतीने ही योजना मतांसाठी आणली होती, सरकारने राज्यातील बहिणीची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी या ट्विटमधून केली आहे.
रवी राणा काय म्हणाले होते?
तत्पूर्वी, रवी राणा यांनी एका सभेत माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. मी सरकारला विनंती केली की, दीड हजार रुपयांचे तीन हजार रुपये झाले पाहिजे. आपण हे जेंव्हा म्हणू शकतो तेंव्हा तुम्ही त्यांना भरभरून आशीर्वाद द्याल. ज्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला नाही, मी तुमचा भाऊ आहे ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन येईल, असे विधान आमदार रवी राणा यांनी केले होते. त्यामुळे त्यांच्यावर सध्या मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. दरम्यान, मी हे वक्तव्य गमतीने केले असून विरोधक त्याचा विनाकारण बाऊ करत आहे, असे स्पष्टीकरण रवी राणा यांनी दिले आहे.