संसद भवन घुसखोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेत

नवी दिल्ली, 15 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) संसद भवन घुसखोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधार ललित झा याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्याने दिल्लीत येऊन पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. तर ललित हा संसदेतील घुसखोरीच्या संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणातील ही पाचवी अटक आहे. याच्या आधी 4 जणांना पोलिसांनी अटक केली होती. यामध्ये संसदेत घुसखोरी केल्याप्रकरणी सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांना पोलिसांनी अटक केली होती. तसेच त्याच दिवशी संसदेबाहेर कलर स्मोक घेऊन आंदोलन करणाऱ्या निलम आझाद आणि अमोल शिंदे यांना देखील दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. या चौघांना आता कोर्टाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

https://x.com/ANI/status/1735361499802288419?s=20

तत्पूर्वी, ललित झा याची देखील दिल्ली पोलीस कसून चौकशी करीत आहेत. संसदेत घुसून गोंधळ घालण्यामागे त्यांचा काय हेतू होता? हे या चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे. तर ललित झा याने संसदेतील घुसखोरीच्या घटनेचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्यानंतर त्याने बसने राजस्थानमधील नागौर गाठले. तेथे तो त्याच्या दोन मित्रांना भेटला आणि त्याने एका हॉटेलमध्ये रात्र काढली. पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे समजताच, तो बसने दिल्लीला आला त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.



दरम्यान, ललित झा हा नागौरचा रहिवासी आहे. ललित झा हे सर्व आरोपींच्या संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच ललितनेच संसदेबाहेर झालेल्या आंदोलनाचा व्हिडीओ मोबाईलवर बनवून सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्यानंतर तो सागर शर्मा, मनोरंजन डी, निलम आझाद आणि अमोल शिंदे या चौघा आरोपींचे मोबाईल घेऊन पळून गेला होता. या मोबाईलमध्ये संसदेत घुसखोरीच्या कटाचे पुरावे असू शकतात. त्यामुळे ललित झा याने त्यांचे मोबाईल नष्ट केले असण्याची शक्यता दिल्ली पोलिसांनी वर्तवली आहे. तर संसदेत घुसखोरी करण्यामागे या आरोपींचा काय उद्देश होता? याचाच शोध सध्या दिल्ली पोलीस घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *