महाविकास आघाडीची आज बैठक! वंचित बहुजन आघाडीच्या सहभागावर अंतिम निर्णय होणार?

मुंबई, 02 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईत सध्या महाविकास आघाडीची बैठक पार पडत आहे. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हजेरी लावली आहे. तसेच यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण,बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे महाविकास आघाडीतील नेते या बैठकीला उपस्थित आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जागावाटपावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली आहे. यासोबतच या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश करण्यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत सहभाग होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

https://x.com/ANI/status/1753325832633037304?s=20

https://twitter.com/rautsanjay61/status/1753317847336653308?s=19

या प्रमुख विषयांवर होणार चर्चा!

तत्पूर्वी महाविकास आघाडीतील नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना या बैठकीचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार प्रकाश आंबेडकर हे आज या बैठकीला उपस्थित झाले आहेत. यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. दरम्यान, महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीतील सहभागावर अंतिम निर्णय होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय चर्चा होणार? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती

काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये अजून सहभाग झाला नसल्याचे स्पष्ट केले होते. वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील सहभागाविषयी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्याकडून निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यासंदर्भात काँग्रेसचा निर्णय त्यांचे दिल्लीतील हायकमांडचे नेते घेत असतात. काँग्रेसच्या हायकमांडने अद्याप त्यांचा निर्णय दिला नाही, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत सहभाग झाला नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी तेंव्हा स्पष्ट केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *