मुंबई, 08 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. अशातच येत्या 24 तासांत कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांत तापमानात वाढ होऊन वातावरण उकाड्याचे राहण्याची शक्यता आहे.
https://x.com/RMC_Mumbai/status/1909545311250309484?t=CKre2lzYm2c0M6t-z9p4Lg&s=19
यासोबतच येत्या दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्ण रात्रीची शक्यता आहे. म्हणजेच रात्री तापमानात अधिक उष्णता टिकून राहण्याची शक्यता आहे. यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता असते, विशेषतः वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी काळजी घेणे आवश्यक आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट जाणवू शकते. अशा परिस्थितीत नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे, शक्यतो उन्हात जाणे टाळावे आणि अंगावर हलके कपडे परिधान करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट
या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने मंगळवारी (दि. 8 एप्रिल) पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. हवामानातील बदल लक्षात घेता, नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचना लक्षपूर्वक पाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.