मुंबई, 24 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांत आजच्या दिवशी (दि.24) विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
https://x.com/RMC_Mumbai/status/1904080848300745160?t=SzMEWeh8jlOXxA-QH2BJPA&s=19
राज्यात उष्णतेची लाट
तर दुसरीकडे, राज्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले आहे. सोलापूर आणि अकोला येथे आज (24 मार्च) 40.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुण्यातही तापमान 37.8 अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
ज्या लोकांना उष्णतेचा जास्त त्रास होतो, त्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळी उन्हात जाणे टाळावे. जास्त वेळ उन्हात थांबू नका. तहान लागली नाही तरीही पुरेसे पाणी प्या, शरीर हायड्रेट ठेवा. हलके, सैलसर आणि सुती कपडे घाला. घराबाहेर जाताना टोपी, ओला रुमाल किंवा छत्री वापरून डोकं झाका.
उन्हाच्या तीव्रतेच्या वेळी काम करणाऱ्या लोकांनी थेट सूर्यप्रकाशात जाऊ नये. शक्य असल्यास जड कामे सकाळी किंवा संध्याकाळी करा. उष्णतेमुळे चक्कर येणे, अशक्तपणा, डोकेदुखी, मळमळ, घाम जास्त येणे किंवा भोवळ येणे यासारखी लक्षणे जाणवली, तर लगेच डॉक्टरांकडे जा. सर्व नागरिकांनी आवश्यक काळजी घेऊन स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवावं, असे हवामान विभागाने सांगितले आहे.