मुंबई, 14 मे: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण-गोवा परिसरातील काही भागांमध्ये आजच्या दिवशी (दि.14) विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असून, 50-60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
अनेक भागांत पावसाची शक्यता
मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असून, वाऱ्याचा वेग 50-60 किमी प्रतितासपर्यंत जाऊ शकतो. मराठवाड्यातही काही ठिकाणी विजांचा कडकडाट, 50-60 किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण-गोवा भागात काही ठिकाणी विजांसह 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज (दि. 14 मे) पालघर, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट
तसेच आज ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि 40-50 किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने त्या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
सातारा, सांगली ऑरेंज अलर्ट
याशिवाय हवामान विभागाने आजच्या दिवशी सातारा आणि सांगली या जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
नागरिकांनी सतर्क रहावे
त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी थांबावे व आवश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे. हवामानाशी संबंधित अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावे. विजांच्या गडगडाटादरम्यान उघड्यावर न जाणे, झाडांच्या खाली थांबणे टाळणे व मोबाईल फोनसारख्या धातूच्या वस्तूंचा वापर कमी करणे हे सुरक्षिततेसाठी उपयुक्त ठरेल, असे आवाहन करण्यात आले आहे.