मुंबई, 17 मे: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर सेवा देण्यासाठी ‘स्मार्ट बसेस’ सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
3 हजार नव्या बस खरेदीसाठी बैठक
नवीन 3 हजार बस खरेदीच्या अनुषंगाने बस उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींशी घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, संबंधित विभागप्रमुख तसेच विविध बस उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज स्मार्ट बसेस
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, या नव्या बसांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीवर आधारित कॅमेरे, जागतिक स्थाननिर्धारण प्रणाली (जीपीएस), एलईडी टेलिव्हिजन, वाय-फाय सेवा, चालकासाठी ब्रेथ अॅनालायझर यंत्रणा, चोरी प्रतिबंधक प्रणाली (एंटी-थेफ्ट टेक्नॉलॉजी) आणि बस लॉक सिस्टम यांसारखी आधुनिक उपकरणे एकात्मिक स्वरूपात बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे या स्मार्ट बसेस अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि प्रवाशांसाठी आरामदायी ठरणार आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य
स्वारगेट बसस्थानकावरील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. प्रत्येक बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. चालकाच्या वाहन चालवण्याच्या पद्धतीवर देखील या ‘तिसऱ्या डोळ्या’द्वारे सतत नजर ठेवली जाईल. तसेच बसस्थानक व परिसरात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बसेस देखील पूर्णपणे लॉक राहतील, अशी यंत्रणा उभारण्यात येणार आहे.
स्वारगेट बसस्थानकावरील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. प्रत्येक बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. चालकाच्या वाहन चालवण्याच्या पद्धतीवर देखील हे कॅमेरेतिसऱ्या डोळ्यासारखे सतत नजर ठेवतील. तसेच बसस्थानक व परिसरात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बसेस देखील पूर्णपणे लॉक राहतील, अशी यंत्रणा उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.
एलईडी टीव्हीवर माहिती व जाहिराती
नवीन बसमध्ये लावण्यात येणाऱ्या एलईडी टीव्हीद्वारे जाहिरातींसह महत्त्वाच्या बातम्या, तसेच पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचे संदेश तातडीने प्रवाशांपर्यंत पोहोचवले जातील. या एलईडी स्क्रीन बसच्या बाहेरील बाजूसही लावण्यात येणार असून त्याद्वारे जाहिरात महसूलात वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
फोम बेस अग्निशमन तंत्रज्ञान
सध्या वाढलेल्या तापमानामुळे काही एसटी बसेसना आग लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर, नव्या बसांमध्ये फोम बेस अग्निशमन प्रणाली लावण्यात येणार असून, आग लागल्यास संबंधित ठिकाणी तात्काळ फोम फवारून आग विझवण्याची व्यवस्था या यंत्रणेत करण्यात आली आहे.
या सर्व आधुनिक सुविधांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसह अपघातांचे प्रमाण कमी होईल, तसेच बससेवेची वेळेची शिस्त अधिक सुधारेल. परिणामी, खऱ्या अर्थाने एसटी सेवा ‘स्मार्ट’ होईल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.