पुणे, 23 मे: (विश्वजीत खाटमोडे) हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, पुढील काही तासांत विजांच्या कडकडाटासह 50-60 किमी प्रतितास जोरदार वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, रायगड, मुंबई, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, सातारा, बीड, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये गडगडाटी वादळासह मध्यम स्वरूपाचा पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.
https://x.com/InfoDivPune/status/1925540280494686656?t=cpxSZperqDkcZkSv-qEvow&s=19
पुण्याला रेड अलर्ट!
हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी आणि पुणे या जिल्ह्यांना आज (दि.23) रेड अलर्ट जारी केला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट
याशिवाय, धुळे, नंदुरबार, जळगाव, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आला आहे.
https://x.com/RMC_Mumbai/status/1925524831719632935?t=kCZDmoKg_X46XUg-OF5_cg&s=19
राज्यात सर्वत्र पाऊस
दक्षिण कोकण व गोवा किनारपट्टीच्या जवळ, तसेच पूर्व व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात सध्या पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील अनेक भागांत सध्या पाऊस कोसळत आहे. तर अरबी समुद्रातील हे कमी दाबाचे क्षेत्र येत्या काही तासांत अधिक तीव्र होणार असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.