महाराष्ट्र प्रदूषण विभागाची पवारांना मध्यरात्री नोटिस!

बारामती, 28 सप्टेंबरः महाराष्ट्र प्रदूषण विभागाने आज, 28 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 2 च्या सुमारास आमदार रोहित पवार यांना नोटिस बजावली आहे. या नोटिसमध्ये 72 तासांमध्ये राजेंद्र पवार आणि रोहित पवार यांचा बारामती अ‍ॅग्रो प्लँट बंद करण्याची सूचना केली आहे. या संदर्भातील खुलासा खुद आमदार रोहित पवार यांनी ट्वीटवर केली आहे. तसेच महाराष्ट्र प्रदूषण विभागाच्या या कारवाईमागे दोन मोठ्या नेत्यांचा हात असल्याचे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

तसेच रोहित पवारांनी त्यांच्या ट्वीटमध्ये पुढे म्हटले की, “राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली.

युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे.

हा लढा मी लढणारच आहे, परंतु ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे त्यांना एकच सांगायचंय की, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो, परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही.

आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त ‘गिफ्ट’ दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो, परंतु राज्यातली युवा आणि जनता सरकारला नक्कीच ‘रिटर्न गिफ्ट’ देईल, ही खात्री आहे.

असो!

पण सर्वसामान्यांच्या कामाला महिनोन महिने सुस्ती दाखवणारी यंत्रणा या दोन नेत्यांच्या इच्छेसाठी माझ्यावर कारवाई करताना खूप तत्परता दाखवते, याचा मात्र नक्कीच आनंद आहे. या सर्व प्रक्रियेत शासकीय अधिकाऱ्यांना मी कुठलाही दोष देत नाही. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून सत्याच्या आधारे न्यायालयात माझा लढा सुरूच राहील.”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत शरद पवार आणि अजित पवार हे दोन गट निर्माण झाले असून आमदार रोहित पवार हे शरद पवार यांच्या सोबत गेले आहे. या कारणामुळे तर राजेंद्र पवार आणि रोहित पवार यांच्या मालकीची बारामती अ‍ॅग्रोवर तर कारवाई झाली नाही ना? सुडबुद्धीने कारवाई करणारे हे दोन व्यक्ती कोण आहेत? बारामती अ‍ॅग्रो कंपनीवर झालेल्या कारवाई मागे पवार घराण्यातील कोणी नाही ना?  अशी चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये होत आहे.

One Comment on “महाराष्ट्र प्रदूषण विभागाची पवारांना मध्यरात्री नोटिस!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *