महाराष्ट्र केसरी स्पर्धा: शिवराज राक्षेची पंचांना लाथ!

महाराष्ट्र केसरी 2025 – शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली.

अहिल्यानगर, 02 फेब्रुवारी: अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत एक खळबळजनक घटना घडली आहे. उपांत्य फेरीत शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात शनिवारी (दि.02) सामना रंगला. मात्र, या सामन्यात पराभव झाल्यानंतर शिवराज राक्षेने पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेत वाद घातला आणि संतापाच्या भरात पंचांना लाथ मारली. या प्रकारामुळे यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागल्याचे पाहायला मिळाले आहे. या घटनेमुळे याठिकाणी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पंचांना लाथ मारली

उपांत्य फेरीच्या सामन्यात पृथ्वीराज मोहोळने विजय मिळवल्यानंतर शिवराज राक्षेने या निर्णयावर नाराजी व्यक्त करत थेट पंचांची कॉलर पकडली आणि त्यांना लाथ मारली. त्यानंतर काही वेळ स्पर्धेच्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला. या घटनेनंतर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आणि त्यांनी शिवराज राक्षेला बाजूला केले. या प्रकारामुळे कुस्तीप्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

पंचांचा निर्णय चुकीचा – शिवराज राक्षे

दरम्यान, शिवराज राक्षेने आपल्या वागण्याचे समर्थन करत “माझा खांदा टेकला नव्हता, पंचांचा निर्णय चुकीचा होता,” असा दावा केला आहे. मात्र, त्याच्या या वर्तनामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या प्रतिष्ठेला गालबोट लागले आहे. या घटनेनंतर शिवराज राक्षेविरोधात कडक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंचांवर हल्ला करणे हा गंभीर प्रकार मानला जात असल्याने याप्रकरणी शिवराज राक्षेवर कारवाई होण्याची शक्यता आहे. तर या स्पर्धेदरम्यान झालेल्या वादग्रस्त घटनेमुळे कुस्तीप्रेमींमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

https://x.com/InfoAhilyanagar/status/1886085291812827345?t=HHNKv-xtV4fLvWzc5AHKrg&s=19

पृथ्वीराज मोहोळ ठरला महाराष्ट्र केसरी!

या वादग्रस्त घटनेनंतर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. यावेळी पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम सामना रंगला. या लढतीत पृथ्वीराज मोहोळने विजय मिळवत ‘महाराष्ट्र केसरी’ किताब जिंकला. या सामन्याचा थरार पाहण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे उपस्थित होते. त्यावेळी अंतिम सामन्यातील विजेता पृथ्वीराज मोहोळला अजित पवार यांच्या हस्ते चांदीची गदा आणि थार गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *