पुणे, 11 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा आजपासून (11 फेब्रुवारी) सुरू झाली असून, ही परीक्षा 18 मार्च 2025 पर्यंत चालणार आहे. राज्यभरात 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.
परीक्षेसाठी विशेष खबरदारी
ही परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत घेतली जात आहे. परीक्षेच्या सुरळीत आणि पारदर्शक आयोजनासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. राज्य सरकार आणि शिक्षण मंडळाने परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त आणि शांत वातावरणात पार पाडण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत.

कॉपीमुक्त परीक्षेसाठी कडक नियम लागू
राज्यात परीक्षा काळात गैरप्रकार टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. परीक्षेदरम्यान कॉपी रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवले जात असून, खालील उपाययोजना केल्या जाणार आहेत –
ड्रोनच्या सहाय्याने परीक्षा केंद्रांवर नजर
संवेदनशील परीक्षा केंद्रांवर जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेरे लावून देखरेख केली जाणार आहे.
परीक्षा केंद्रांची पूर्वतयारी
परीक्षा सुरू होण्याआधी एक दिवस सर्व परीक्षा केंद्रांवरील सुविधा व्यवस्थित आहेत की नाही, याची खात्री जिल्हा प्रशासनाने केली आहे.
चित्रफितीच्या माध्यमातून देखरेख
परीक्षा केंद्राच्या बाहेरही व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येईल, जेणेकरून कोणत्याही गैरप्रकारास आळा बसू शकेल.
भरारी पथके व चेहरा ओळख प्रणाली
परीक्षा केंद्रांवर भरारी पथके आणि स्थिर पथके कार्यरत असतील. तसेच, परीक्षा केंद्रावर नियुक्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची ओळख फेशियल रेकग्निशन सिस्टम प्रणालीच्या माध्यमातून तपासली जाणार आहे.
कडक कायद्यांची अंमलबजावणी
परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. अशा व्यक्तींवर दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येतील.
झेरॉक्स केंद्रे बंद आणि कलम 144 लागू
परीक्षा केंद्राच्या 500 मीटर परिसरात झेरॉक्स केंद्रे बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच, परीक्षेच्या सुरळीत पार पडण्यासाठी या परिसरात कलम 144 लागू करण्यात येणार आहे.