मुंबई, 25 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जानेवारी महिन्याचा लाभाचा हप्ता जमा होण्यास सुरूवात झाली आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. दि. 25 जानेवारी 2025 रोजी तब्बल 1.31 कोटी महिलांच्या बँक खात्यात हा लाभाचा हप्ता जमा करण्यात आला असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले.
https://x.com/iAditiTatkare/status/1883208289556816282?t=kOHC75YYZSj0awVr241eZA&s=19
आदिती तटकरे यांची माहिती
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत आतापर्यंत 2.41 कोटी महिलांच्या बँक खात्यात निधी जमा करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेत असलेल्या पात्र महिलांच्या बँक खात्यात 26 जानेवारी 2025 पर्यंत लाभाचा हप्ता जमा करण्याचे काम पूर्ण होईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थी महिलांना आजच्याच दिवशी जानेवारी महिन्यातील लाभाचे पैसे मिळणार आहेत.
सातवा हप्ता मिळणार!
दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाने राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य व प्रोत्साहन मिळावे यासाठी जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली. या योजनेमार्फत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ दिला जातो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आतापर्यंत जुलै ते डिसेंबर या कालावधीत 6 हप्त्यांचे पैसे मिळालेले आहेत. तर महिलांना आता जानेवारी महिन्यातील लाभाचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे या योजनेतील महिलांना मिळणाऱ्या लाभाची एकूण रक्कम 10 हजार 500 रुपये होणार आहे. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.